Ad will apear here
Next
किताबें कुछ कहना चाहती हैं....


‘मेक इंडिया रीड’ अर्थात अख्ख्या भारताला वाचनाची गोडी लावण्याचं स्वप्न घेऊन अमृत देशमुख नावाचा एक तरुण कार्यरत आहे. वाचलेल्या पुस्तकांचे सारांश तो ‘बुकलेट’ या अॅपद्वारे लाखो लोकांपर्यंत तो मोफत पोहोचवतो. हे सारांश ऑडिओ स्वरूपातही दिले जातात. वाचनामृताची गोडी लावणाऱ्या अमृतची गोष्ट पाहू या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदराच्या आजच्या भागात....
..........
हिंदीमधले प्रसिद्ध कथाकार निर्मल वर्मा म्हणतात, ‘मी पुस्तक वाचण्याच्या आधी जो होतो, तो नंतर राहत नाही.’ खरंच आपलं जगच बदलवून टाकतात ही पुस्तकं! जेव्हा मनाची द्विधा अवस्था होते, तेव्हा आपल्यातल्या विचारांचं संक्रमण, बदल याची चाहूल लागलेली असते. झाडाची जुनी, वाळलेली पानं गळून पडावीत, तशा कित्येक विचारांची पानगळ ही पुस्तकं आपल्यात करवून आणतात. आणि मग नवी पालवी फुटलेल्या मनाला ती नव्या विचारांचे रस्तेही दाखवतात. 
सफदर हाश्मी या विख्यात कवीने म्हटलं आहेच -

किताबें कुछ कहना चाहती हैं,
तुम्हारे साथ रहना चाहती हैं,
किताबें करती है बातें, बीते जमानों की
दुनिया की, इन्सानों की
आज की, कल की, एक एक पल की
खुशियों की, गमों की, फूलों की और बमों की
जीत की, हार की, प्यार की, मार की,
क्या तुम नहीं सुनोगे, इन किताबों की बातें?
किताबें कुछ कहना चाहती हैं,
तुम्हारे साथ रहना चाहती हैं, 
किताबों में चिडियाँ चहपहाती हैं
किताबों में खेतियाँ लहलहाती हैं
किताबों में, झरने गुनगुनाते हैं,
परियों के किस्से सुनाते हैं
किताबों में राकेट का राज है
किताबों मे साइन्स की आवाज है
किताबों मे कितना बडा संसार है
किताबों मे ज्ञान का भंडार है
क्या तुम इस संसारमे नहीं आना चाहोगे?
किताबें कुछ कहना चाहती हैं,
तुम्हारे साथ रहना चाहती हैं

इंग्लंडची प्रसिद्ध लेखिका व्हर्जिनिया वुल्फ हिनं आपल्या एका पुस्तकात पुस्तकांविषयीच लिहून ठेवलंय, ते खरंच खूपच रंजक आहे. एकदा पुस्तकप्रेमी सेंट पीटर यांच्याजवळ गेले, तेव्हा पीटर यांनी विचारलं, की ‘या लोकांनी काय काय कामं केली आहेत? त्यावरून यांना स्वर्गात पाठवायचं की नाही हे ठरवता येईल.’ तेव्हा पीटरला सांगितलं गेलं, की ‘ही सगळी मंडळी पुस्तकांची भक्त आहेत.’ तेव्हा ते त्वरेनं उत्तरले, ‘अरे, मग यांना काहीच प्रश्न विचारू नका. कारण स्वर्गात जे काही प्राप्त झालं असतं, ते सगळंच यांनी पुस्तकांतून आधीच मिळवलं आहे. या मंडळींना स्वर्गाचीही आवश्यकता नाही.’ मुक्तीचा क्षण या पुस्तकांनी त्या लोकांना बहाल केला. खरंच, पुस्तकांविषयी यापेक्षा आणखी सुंदर भाष्य काय असू शकतं? 

माझी मैत्रीण नीलिमा पालवणकर हिची पुस्तकांवर अतिशय सुंदर कविता आहे. ती म्हणते -

पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतात
तेव्हा आपण जमीन व्हावं लागतं
आणि मुरवावं लागतं त्यांना
आपल्यात
कधी ती झाडं होतात घनदाट
तेव्हा आपण पांथस्थ होऊन
बसायचं असतं त्यांच्या सावलीला
निवांत
कधी कधी तर ती पक्षी होतात
तेव्हा पंखांत बळ घेऊन
उडावं लागतं आपल्याला, त्यांच्या 
बरोबरीनं
पुस्तकांतून कधी कधी शिशिरही भेटतो
मग आपण उजाड माळ होतो
तेव्हा तीच वसंताची चाहूल होतात
आपल्यासाठी
पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो
पण त्यासाठी मनाला फुटाव्या लागतात
संवेदनांच्या लक्ष पाकळ्या
मग पुस्तकं उधळून टाकतात
वसंतातले सगळे रंग
पुस्तकांना कळतं सगळं, सगळं
आपल्याला कळतं का?
पुस्तकांचं आभाळमन?

जग हजारो रंगांनी चितारलं गेलंय. त्या प्रत्येक रंगांच्या परत अनेक तरल छटा आणि त्या सगळ्या रंगांना घेऊन पुस्तकं आपल्या मनात प्रवेश करतात. कित्येक रंगांना तर आपण बघितलेलंही नसतं. पुस्तकांची शक्ती दृश्य माध्यमापेक्षा कितीतरी पटीनं अधिक आहे असंच मला नेहमी वाटतं. कारण एखादा चित्रपट आपण बघतो, तेव्हा ते कथानक काय सांगू पाहतं ते दिग्दर्शक आपल्याला त्याच्या नजरेतून बघायला लावतो; पण पुस्तकं वाचकागणिक एक वेगळंच दृश्य तयार करतात. कथा तीच असते; पण वाचणारा त्याच्या नजरेतून वेगळे रंग भरतो. या संदर्भात लॅटिन अमेरिकन नोबेल पुरस्कारप्राप्त लेखक गॅब्रियल आर्सिया मार्क्वेज यांचा एक किस्सा खूपच बोलका आहे. हे लेखक महोदय त्यांच्याकडे कोणी चित्रपट निर्माता आला, की आपल्या पुस्तकांवर चित्रपट बनवायला मनाई करत. ‘हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ हे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक. या पुस्तकावर आधारित चित्रपट काढण्यासाठी हॉलिवूडवाल्यांनी त्यांना करोडो डॉलर्सचा प्रस्ताव दिला; पण तरीही महाशय आपल्या मतावर, आपल्या नकारावर ठामच होते. कोणा एकाने त्यांना विचारलं, की तुम्ही तुमच्या पुस्तकांवर चित्रपट बनवण्यास नकार का देता? उत्तरादाखल ते म्हणाले, ‘माझ्या लाखो वाचकांच्या मनात माझ्या पुस्तकातल्या पात्रांच्या प्रतिमा त्यांनी वाचून बनवल्या आहेत. त्या त्यांच्या मनात कोरल्या गेल्या आहेत. चित्रपट बनवला तर या प्रतिमांचं बहुवैविध्य नष्ट होईल, त्यांची कल्पनाशक्ती थांबेल, तिचाही एकप्रकारे तो अंतच होईल आणि नेमकं तेच मला नकोय.’ पुस्तकं ही अशी असतात.



पुस्तकं वाचकाला एक कल्पक कलाकार, एक संवेदनशील माणूस आणि एक समृद्ध व्यक्ती बनवतात. पुस्तकं आम्हाला काय देत नाहीत? आमच्याशी काय बोलत नाहीत? सगळं काही - भरभरून. असं म्हणतात, माणसाची श्रीमंती त्याच्याकडे असलेल्या, त्यानं वाचलेल्या पुस्तकांवरून कळते! 

खरं तर पुस्तकांशी मैत्री म्हटलं, तर कुठल्याही वयात होऊ शकते; पण लहान वयात लागलेली पुस्तकांची गोडी आयुष्यभर टिकते. वाचनाची गोडी लावण्याचं काम पूर्वी घरातली आजी करायची. तिच्याकडून रोज एक गोष्ट ऐकणं म्हणजे पुस्तक वाचण्यासारखं असायचं. आजीचं हे बहुमोल काम आज एक तरुण मोठ्या प्रमाणावर करतोय. त्याचं नाव अमृत देशमुख - त्याचीच ही गोष्ट!!!

‘सीए’सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन अमृत देशमुख या तरुणानं एके दिवशी एका मोठ्या कंपनीतली आपली सहा आकडी पगाराची नोकरी सोडून दिली आणि तो पुस्तकांच्या जगाकडे ओढला गेला. ‘मेक इंडिया रीड’ म्हणजेच ‘प्रत्येक भारतीयाने वाचलंच पाहिजे’ या वेडानं अमृत झपाटला गेला. आज त्याला ‘बुकलेट गाय’ म्हणूनच ओळखलं जातं.



अमृतला लहानपणापासून वाचनाचं वेड नव्हतं. अमृत लहान असताना त्याचा भाऊ अमृतच्या वाढदिवसाला सगळ्यांना बोलवायचा आणि सांगायचा, की कोणीही भेटवस्तू म्हणून त्याला फक्त पुस्तक द्यायचं, बाकी काही द्यायचं नाही. त्या वेळी अमृत सहा ते सात वर्षांचा असेल. त्याला आपल्या भावाची ही गोष्ट मुळीच आवडायची नाही. एकदा सगळे गावाला गेले असताना अमृतनं एक ‘फेक’ म्हणजे खोटा वाढदिवस साजरा केला आणि पुस्तकांव्यतिरिक्त इतर भेटवस्तू मित्रांकडून मिळवल्या आणि अर्थातच या गोष्टीचा आनंदही मिळवला; पण पुढे आपल्या भावामुळेच अमृतला पुस्तकं वाचायला आवडायला लागलं. अमृत आधी लहान मुलांसाठी असलेली पुस्तकं वाचायचा. त्यानंतर हळूहळू प्रकार बदलत गेले.

यातूनच अमृतला वेगानं वाचायचं तंत्र समजलं. वाचनाचा वेग चांगला असेल, तर आपली झोप उडते. ब्रेन लव्हज स्पीड. हळू वाचलं की झोप येते. वाचनाचा सरासरी वेग एका मिनिटाला १५० ते २५० शब्द असा असतो. अमृतचा तो वेग १२०० शब्द एवढा आहे. त्याचं एक तंत्र आहे. ते माहीत करून त्याची प्रॅक्टिस करायला हवी. विवेकानंद अशाच पद्धतीनं (व्हिज्युअल पद्धत) वाचायचे.

अमृत सीए झाला आहे. खरं तर त्यानं सीए होणं हेही काही सोपं काम नव्हतं. ‘सीए’चा लाँग फॉर्म लोक गमतीनं ‘कम अगेन’ असा करतात; मात्र अमृतनं सांगितलं, ‘मी सीए झालो, याचं कारण माझ्या वडिलांचे जे जे सीए मित्र होते, त्यांच्या बायका दिसायला खूप सुंदर होत्या. त्यामुळे आपण सीए झालो तर आपल्यालाही बायको सुंदर मिळणार असा माझा भाबडा समज होता.’ ही झाली गमतीची गोष्ट; पण सीए होईपर्यंत आपण सीए का होतोय याची स्पष्टता अमृताला आली नव्हती. ही स्पष्टता, हा दृष्टिकोन, प्रत्येक गोष्टीला ‘का’ हा प्रश्न विचारण्याचं कुतूहल आणि जिज्ञासा अमृतला पुस्तकांनी दिली.



पुस्तकांनी आपल्या आयुष्याचा उद्देश काय हे कळायला अमृतला मदत केली. अमृतचा दृष्टिकोन बदलला. आधी तो कमी बोलणाऱ्यांना तुच्छ लेखायचा. हळूहळू त्याचा दृष्टिकोन बदलला. लोक कमी बोलतात, याचा त्यांच्या क्षमतेशी काहीएक संबंध नाही, ही गोष्ट अमृतला कळली. तसंच अमृतला मल्टिटास्किंगचा खूप अभिमान वाटायचा. आपण एका वेळी अनेक गोष्टी करू शकतो, याची तो फुशारकी मारायचा; मात्र पुस्तकांनी अमृतला सांगितलं, की आपला मेंदू हा मल्टिटास्किंगसाठी अनुकूल नाही. वन थिंग अॅट ए टाइम. एका वेळी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा/फोकस करा. पुस्तकं आपल्या जगण्यात आनंद भरतात आणि हे पुस्तकांनी त्याला सांगितलं.



एकदा अमृत आणि त्याचा मित्र गप्पा मारत बसलेले असताना ‘सीए’मधलं सुरुवातीचं अपयश, स्टॉक मार्केटमध्ये आलेलं अपयश यामुळे तो थोडा निराश झाला होता. त्याच्या मित्रानं त्याला ‘आपण बाहुबली चित्रपटाला जाऊ’ असं म्हटलं. सिनेमाला गेलेला असताना मूड तर नव्हताच. ‘सेव्हन हॅबिट्स’ हे स्टीफन कोवेनचं पुस्तक तेव्हा तो वाचत होता. चित्रपट सुरू व्हायला वेळ असल्यानं अमृतनं त्या पुस्तकात काय आहे, ते आपल्या मित्राला सांगितलं. मित्र इतका इम्प्रेस झाला, की तो म्हणाला, ‘मला पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही; पण तू पुस्तक वाचलंस, की त्याचा सारांश मला पाठवत जा.’ अमृतला आपल्या वाचनाचा आणि ते सांगण्याचा दुसऱ्याला उपयोग होतोय, आवडतंय, हे कळताच खूप आनंद झाला. 



अमृतचं त्यानंतर चित्रपटात लक्षच लागेना. मध्यंतरात खोटं बोलून अमृत घरी निघाला. त्याच्या डोक्यात काही कल्पना आली होती. इंटरनेटवर सर्च केल्यावर पुस्तकांवर तसं काम दुसरं कोणी करत असल्याचं त्याला आढळलं नाही. आपण हे काम करायचं असं त्यानं पक्कं ठरवलं; मात्र त्याला त्यासाठीचं अॅप बनवायचं माहीत नव्हतं. तसंच आयटीचं ज्ञान त्याच्याजवळ नव्हतं. तुमच्याकडे काय आहे, हे महत्त्वाचं नसून, तुमच्याकडे जे आहे त्याचं तुम्ही काय करता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, हे अमृतला समजलं. आपण व्हॉट्सअॅपचा उपयोग करायचा, असं अमृतने ठरवलं. अमृतनं ‘विंग्ज ऑफ फायर’ हे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं पुस्तक वाचून त्याचा सारांश लिहिला आणि तो आपल्या दहा मित्रांना पाठवला. तो वाचून एकाच आठवड्यात त्याला हजार लोकांनी आम्हालाही असा पुस्तकांचा सारांश पाठव, अशी विनंती केली.



अमृतनं आतापर्यंत १२५० पुस्तकं वाचली आहेत. १५० सारांश बनवले आहेत. आठवड्याला एक साराश आपण पाठवत असतो, असं तो म्हणाला. वाचणारे लोक नंतर पुस्तकापर्यंत जातात, की तिथे थांबतात या गोष्टीची अमृतला भीती वाटत होती. मग त्यानं अॅमेझॉनच्या लिंक चेक केल्या, तेव्हा त्याला त्यावरील ट्रॅफिक वाढल्याचं आढळलं.

व्हॉट्सअॅपवर ५० हजार लोक त्याला जोडले गेले, तेव्हा अमृतनं पुन्हा त्यांच्या वाचनाचा पाठपुरावा केला, तेव्हा अनेक लोकांनी वाचलेलं नव्हतं. अमृतला वाईट वाटलं; पण अमृतनं एका पुस्तकात वाचलं होतं, की ज्या लोकांना प्रभावित करायचंय त्यांचा दिनक्रम तपासा आणि त्यातून उपाय शोधा. अमृतनं ते करून बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की सगळे लोक कामावर जाताना प्रवासात कानात हेडफोन घालून काहीतरी ऐकताहेत. आपण या वेळेचा उपयोग करून घेतला पाहिजे ही गोष्ट अमृतच्या लक्षात आली. त्या दिवशी घरी आल्यावर अमृतनं त्या पुस्तकाच्या सारांशाचं स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग केलं; मात्र त्यानं रेकॉर्ड केलेलं त्यालाच फारसं आवडलं नाही. मग त्या रेकॉर्डिंगवर आणि स्वतःवरदेखील त्यानं खूप काम केलं. त्यात नाट्यमयता आणली. आवाजाचे चढउतार तो शिकला. आपलं म्हणणं ऐकायला हवं अशी रंजकता त्यानं त्यात आणली. या ऑडिओ रेकॉर्डिंगनं मात्र लोक पुस्तकं ऐकू लागले आणि त्यावरच्या प्रतिक्रियाही देऊ लागले.



जेव्हा व्हॉट्सअॅपवर अमृतचे एक लाख वाचक सदस्य बनले, तेव्हा त्याला अचानक एक ई-मेल आला आणि तुम्हाला व्हॉट्सअॅपवरून ‘बॅन’ करण्यात आलेलं आहे, असं कळवण्यात आलं. अमृत काही तरी ‘चीप मार्केटिंग’ करत असल्याचा संशय त्यांना आला. अमृतला आपला नंबर बंद झाल्याचं बघून काय करावं तेच सुचेनासं झालं. यातून मित्र मदतीला धावले आणि बुकलेट नावाचं मोबाइल अॅप तयार झालं. २३ एप्रिल हा महान नाटककार शेक्सपिअरचा जन्मदिवस आणि स्मृतिदिन असतो. त्या दिवसाचं औचित्य साधून हे अॅप अमृतने लाँच केलं. सध्या तो अनेक पुस्तकं वाचतो आणि त्यांचा सारांश काढतो. आपल्या पुस्तकवेडानं आपल्याबरोबरच जगभरातल्या साडेसहा ते सात लाख लोकांना त्यानं स्वतःबरोबरच जोडून घेतलं आहे. या पुस्तकवेडातूनच त्यानं बुकलेटगाय नावाचं अॅप तयार केलं आहे आणि ते मोफत कुणालाही इन्स्टॉल करता येईल, याची व्यवस्था केली आहे.

वेध कार्यक्रमात डॉ. आनंद नाडकर्णींसोबत अमृत देशमुख

अमृतच्या अॅपवरील वाचकवर्गात ७५ टक्के स्त्रिया आहेत. त्यानंतर कॉलेजवयीन आणि इतर लोक आहेत. आता इतरही अनेक लोक अमृतच्या मदतीसाठी पुढे येताहेत. अनेक भाषांमधल्या पुस्तकांसाठीही लोक आज विचारणा करताहेत. पुस्तकं कशी निवडायची, हे लाखो लोक जोडले गेल्यामुळे त्याला कळायला लागलं आहे. लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया येतात. एकदा रात्री अकरा वाजता अमृतला एका तरुण मुलीचा फोन आला. ती अमृतची खूप प्रशंसा करत होती. अमृतला वाटलं, ती असाच टाइमपास करत असावी. अमृतने आपण पाठवलेले कुठले रिव्ह्यू तिने वाचलेत, असं विचारल्यावर तिने सांगितलं, ‘मी अंध आहे. तुझे रिव्ह्यू मी वाचले नसून ऐकले आहेत.’ आपण ज्या प्रकारे वाचतो आहोत ते इतक्या प्रभावीपणे असं पोहोचत आहे, हे बघून अमृत स्तिमित झाला. अमृतची आई आठ वर्षांपूर्वी हे जग सोडून गेली; मात्र जाताना तिने नेत्रदान केलं होतं. त्या गोष्टीचं महत्त्व अमृतला त्या क्षणी जाणवलं.



सोशल मीडियाचा वापरदेखील अमृत व्यवस्थितपणे करतो. त्याची पाच फेसबुक अकाउंट्स आहेत. त्याचं यू-ट्यूब अकाउंटही आहे. इतरांनीदेखील सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करावा असं तो म्हणतो. 

लेखिका दीपा देशमुख, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासह अमृत देशमुख

हे सगळं करताना अमृतमध्ये अनेक बदल झाले. आधी त्याला परिपूर्णतेत रस होता. पुस्तकांनी त्याला वेगळी दृष्टी दिली. मी जे काही करीन त्यात सुधारणा करत करत पुढे जाईन, हे त्याला उमगलं. अमृतची वाचनाची गती वाढली. अमृतचा भाऊ हेमंत त्याला पुस्तक वाचताना ‘रँडमली’ वाचायला सांगायचा. एकाच प्रकारची पुस्तकं वाचायची नाहीत, असं तो म्हणायचा. एकच ‘जॉनर’ आवडतो असं करायचं नाही. त्यामुळे अमृत सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायला लागला. पुस्तकाचं रेकॉर्डिंग करतानादेखील अनेक गोष्टी त्याला शिकायला मिळाल्या. आधी शिकायचं मग करायचं, हे आपण शिकतो; पण जॉन हर्टनं म्हटलंय, की करत करत शिका. करणं हेच शिकणं. शिकणं आणि करणं या दोन गोष्टी नसून त्या एकच आहेत, या गोष्टी अमृतला समजल्या.

'टेड टॉक्स'मध्ये अमृत

आज अनेक लोक कुरियरने अमृतकडे पुस्तकं पाठवतात. त्यात अनेक साहित्यिकदेखील असतात. त्यामुळे अमृतच्या ग्रंथालयात पुस्तकांची संख्या आपोआप वाढते आहे.

अमृत देशमुखचं पुस्तकवेड स्वतःपुरतंच न राहता, तो जगाला पुस्तकवेड लावू इच्छितो आहे. प्रत्येकाचं जगणं आनंददायी करू पाहतो आहे. सफदर हाश्मी यांच्या शब्दांतून जणू काही तोच सांगतो आहे -

किताबें कुछ कहना चाहती हैं,
तुम्हारे साथ रहना चाहती हैं,

संपर्क : अमृत देशमुख
ई-मेल : bookletguy@gmail.com 
वेबसाइट : http://www.bookletapp.in/
 

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(अमराठी जनांना मराठीचं बाळकडू पाजणाऱ्या कौशिक लेले या तरुणाची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZTTBZ
 I am impress1
 विषय अफलातून आवडला. प्रत्येकाला याचा अभ्यास करण्याची गरज आहे.
Similar Posts
तरुणांना ‘वाचनामृत’ मिळण्यासाठी... सध्याच्या धकाधकीच्या काळात निवांत वेळ काढून एखादं पुस्तक घेऊन वाचत बसणं गोड, हव्याहव्याशा स्वप्नासारखं वाटतं. काही जण ‘आळशी’ या गटात मोडत असल्याने पुस्तकाची फक्त सुरुवातच वाचली जाते. या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या अमृत देशमुख या तरुणानं देशाला वाचतं करण्याचा ध्यास घेतला आहे. गेल्या वर्षी पुस्तकदिनी म्हणजे
रुक जाना नहीं, तू कहीं हार के... बीए, एलएलबी झालेल्या, लग्न होऊन संसारात रुळलेल्या शारदा बापट नावाच्या एका स्त्रीनं आपल्या आईच्या सततच्या आजारपणाचं कारण शोधण्यासाठी चक्क वयाच्या पस्तिशीत डॉक्टर व्हायचं ठरवलं. रीतसर कॉलेज करून, असंख्य अडचणींना तोंड देत त्या डॉक्टर झाल्याही. त्याच दरम्यान त्या वैमानिकही झाल्या, कम्प्युटर्स-इलेक्ट्रॉनिक्स यांवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं
रंगूनवाला इन्स्टिट्यूटच्या ग्रंथालय कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद पुणे : एम. सी. इ. सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्या वतीने १२ डिसेंबर २०१८ रोजी ग्रंथालयविषयक कार्यशाळा (लायब्ररी एक्सटेन्शन अॅक्टिव्हिटी) मावळ तालुक्यातील चिखलसे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घेण्यात आली.
पुस्तकवेडे अप्पा वाचलेली पुस्तकं नि भेटलेली माणसं, आयुष्यात खूप काही शिकवतात, असं एक वचन आहे. म्हणूनच पुस्तकं वाचणारा नि माणसं जोडणारा मनुष्य ज्ञानी आणि खूप भाग्यवान असतो... पुण्यातले प्रमोद आमोंडीकर ऊर्फ अप्पा ही अशीच एक व्यक्ती... ते आहेत एका गॅरेजचे मालक, पण त्यांचं वाचनवेड अगदी एखाद्या अभ्यासू विद्यार्थ्यालाही लाजवेल असं आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language